'जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization - WHO)' आणि 'संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधीमार्फत (United Nations International Children's Emergency Fund - UNICEF)' संयुक्तपणे जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार ५ कोटी भारतीय मुलांकडे स्वच्छता सुविधांचा अभाव असून ही संख्या जगात सर्वाधिक आहे.

ठळक मुद्दे:

  • 'शाळांमधील पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि आरोग्य-स्वच्छता यांमधील प्रगती २०१५-२५ (Progress on Drinking Water, Sanitation, and Hygiene in Schools 2015-25)' या नावाने WHO आणि UNICEF यांनी संयुक्तपणे अहवाल प्रसिद्ध केला आहे.
  • सदर अहवालानुसार भारतात ५ कोटी मुलांकडे स्वच्छता सुविधा उपलब्ध नाहीत. 
  • जगातील अशा एकूण २४.४ कोटी मुलांपैकी जवळपास ही संख्या एक-पंचमांश इतकी असून कोणत्याही देशाच्या तुलनेत ती सर्वाधिक आहे.

भारता पाठोपाठ क्रमवारीतील देश:

  • नायजेरिया (३.४ कोटी)
  • इथिओपिया (२.६ कोटी)
  • डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (१.१ कोटी)
  • इंडोनेशिया (८० लाख)

WHO बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): WHO म्हणजेच World Health Organization अर्थात 'जागतिक आरोग्य संघटना' होय.
  • स्थापना वर्ष: ७ एप्रिल १९४८ रोजी WHO ची स्थापना करण्यात आली होती.
  • दिवसाचे औचित्य: ७ एप्रिल या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षी हा दिवस 'जागतिक आरोग्य दिन (World Health Day)' म्हणून साजरा करण्यात येतो.
  • मुख्यालयाचे ठिकाण: जिनेव्हा, स्वित्झर्लंड (Geneva, Switzerland) येथे WHO चे मुख्यालय स्थित आहे.
  • सदस्य देश: सध्या WHO चे १९४ सदस्य देश आहेत.
  • सध्या कार्यरत महासंचालक: टेड्रोस अधानोम घेब्रेयसस हे सध्या WHO च्या कार्यरत महासंचालक पदावर विराजमान आहेत.

UNICEF बाबत महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): UNICEF म्हणजेच United Nations International Children's Emergency Fund अर्थात संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बाल आपत्कालीन निधी होय.
  • स्थापना वर्ष:  ११ डिसेंबर १९४६ रोजी UNICEF ची स्थापना करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण:  न्यू यॉर्क, अमेरिका येथे UNICEF चे मुख्यालय स्थित आहे.
  • संस्था कार्य व्याप्ती: जगातील जवळपास १९० पेक्षा जास्त देशांमध्ये संस्थेच्या कार्याचे जाले पसरले आहे.
  • सध्या कार्यरत कार्यकारी संचालक: कॅथरीन एम. रसेल हे सध्या UNICEF च्या कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहेत.
  • संस्था वैशिष्ट्य: १९६५ मध्ये युनिसेफला 'बालहक्क आणि जागतिक शांततेसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले होते.