नुकतेच भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या (Indian Institute of Astrophysics- IIA) संचालिका अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना इटलीमध्ये COSPAR विक्रम साराभाई पदक २०२६ जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे:

  • कर्नाटकमधील बंगळुरू स्थित भारतीय खगोलभौतिकी संस्थेच्या (Indian Institute of Astrophysics- IIA) संचालिका आणि ख्यातनाम भारतीय खगोलभौतिकशास्त्रज्ञ अन्नपूर्णी सुब्रमण्यम यांना, विकसनशील देशांमधील अंतराळ संशोधनातील त्यांच्या असाधारण योगदानाबद्दल 'Committee on Space Research (COSPAR)' च्या 'विक्रम साराभाई पदक २०२६' ने सन्मानित करण्यात आले.
  • या सन्मानाची विशेष बाब म्हणजे हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या चौथ्या भारतीय, पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ आणि जागतिक स्तरावर केवळ तिसऱ्या महिला ठरल्या आहेत.
  • इटलीतील फ्लोरेन्स येथे सुरू असलेल्या ४६ व्या 'COSPAR वैज्ञानिक अधिवेशनादरम्यान हे पदक त्यांना अधिकृतपणे प्रदान करण्यात आले.

COSPAR विक्रम साराभाई पदकाबद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पार्श्वभूमी: १९९० मध्ये भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक आणि 'भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (Indian Space Research Organization - ISRO)' संस्थापक असणाऱ्या विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे पदक प्रदान करण्यास सुरुवात झाली.
  • द्विवार्षिक पुरस्कार: हे पदक दर २ वर्षांनी COSPAR आणि 'भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)' यांच्याद्वारे संयुक्तपणे प्रदान केले जाते.
  • यापूर्वीचे भारतीय विजेते: यापूर्वी केवळ ३ भारतीय शास्त्रज्ञ या पदकाचे विजेते ठरले आहेत.

अनिल भारद्वाज (२०२४)

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ गुरबक्ष सिंग लखिना (२०१४)

भारतरत्न उडुपी रामचंद्र (यू.आर.) राव (१९९६)