भारत सरकारमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) केंद्रीय मंडळावर ॲनी जॉर्ज मॅथ्यू, जन्मजय कुमार सिन्हा आणि सय्यद अकबरुद्दीन या ३ अर्धवेळ अशासकीय संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे:

  • भारत सरकारमार्फत यांची केंद्रीय मंडळावर ४ वर्षांच्या कालावधीसाठी अर्धवेळ, अशासकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • वित्त मंत्रालयाच्या (MoF) अंतर्गत असलेल्या वित्तीय सेवा विभागाच्या (DFS) प्रस्तावावर आधारित मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (Appointments Committee of the Cabinet - ACC) RBI कायदा, १९३४ अन्वये २२ ऑगस्ट २०२६ रोजी या नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे.

नियुक्त व्यक्तींविषयी थोडक्यात माहिती:

ॲनी जॉर्ज मॅथ्यू:

  • त्या भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवेतील (Indian Audit and Accounts Service) अधिकारी आहेत.
  • त्या नवी दिल्ली येथील भारताच्या १६ व्या वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य आहेत तसेच त्या माजी विशेष व्यय सचिवदेखील होत्या.
  • सार्वजनिक वित्त, सरकारी लेखापरीक्षण आणि लेखा, खरेदी आणि वित्तीय व्यवस्थापन या क्षेत्रांत त्यांना जवळपास ३४ वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

जन्मजय कुमार सिन्हा:

  • ते बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (Boston Consulting Group - BCG) इंडियाचे अध्यक्ष आहेत.
  • अर्थशास्त्र, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि आर्थिक परिवर्तन या क्षेत्रांत त्यांना गाढा अनुभव आहे.

सय्यद अकबरुद्दीन:

  • ते संयुक्त राष्ट्रांमधील (United Nations - UN) भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी आहेत.
  • आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र व्यवहार यांत त्यांना विशेष नैपुण्य प्राप्त आहे.

RBI बद्दल महत्वपूर्ण माहिती:

  • पूर्ण नाव (Full Form): RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात 'भारतीय रिझर्व्ह बँक' होय.
  • स्थापना वर्ष: RBI कायदा, १९३४ अंतर्गत १ एप्रिल १९३५ रोजी RBI ची स्थापना करण्यात आली होती.
  • बँक राष्ट्रीयीकरण वर्ष: १ जानेवारी १९४९ रोजी RBI राष्ट्रीयीकृत करण्यात आली होती.
  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI चे मुख्यालय स्थित आहे.
  • सध्या कार्यरत गव्हर्नर: सध्या संजय मल्होत्रा हे RBI च्या गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.