टपाल विभागामार्फत नुकतेच पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ५ रुपयांचे स्मारक टपाल तिकीट जारी करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे:
- दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या टपाल विभागाने (Department of Posts - DoP) अर्थात 'इंडिया पोस्ट'ने, नवी दिल्ली येथील बिकानेर हाऊस येथे पद्मविभूषण सतीश गुजराल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त (१०० वर्षे) ५ रुपयांचे स्मारक टपाल तिकीट जारी केले.
- दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्या हस्ते सतीश गुजराल यांच्या भारतीय कला, वास्तुकला तसेच संस्कृती क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा सन्मान करण्यासाठी या तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
- सदर स्मारक टपाल तिकीट अनुज कुमार यांनी डिझाइन केले असून रसील गुजराल अन्साल यांनी यासाठीचा प्रस्ताव मांडला होता.
सतीश गुजराल यांच्याविषयी थोडक्यात महत्वपूर्ण माहिती:
- ते भारतातील अग्रगण्य बहुआयामी कलाकारांपैकी एक होते.
- ७ दशकांहून अधिक काळ चाललेल्या त्यांच्या कारकिर्दीत चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, भित्तिचित्रकार आणि लेखक म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते.
- त्यांना १९९९ मध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या 'पद्मविभूषण'ने सन्मानित करण्यात आले होते.