जगभरात दरवर्षी १३ ऑगस्ट रोजी 'जागतिक अवयवदान दिन (World Organ Donation Day)' साजरा करण्यात येतो.
ठळक मुद्दे:
- मुख्यत्वे १९५४ मधील पहिल्या यशस्वी अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ तसेच अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे, लोकांचे प्राण वाचवण्यास मदत करणे त्याचबरोबर त्यांना अवयवदाते बनण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी जगभरात हा दिवस पाळला जातो.
- १९५४ मध्ये जगातील पहिले यशस्वी 'जिवंत दात्याकडून मूत्रपिंड प्रत्यारोपण' अमेरिकन शल्यचिकित्सक डॉ. जोसेफ ई. मरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 'पीटर बेंट ब्रिघम हॉस्पिटल' (सध्याचे 'ब्रिघम अँड विमेन्स हॉस्पिटल') येथे केले. अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स राज्यातील बोस्टन शहरात हे रुग्णालय स्थित आहे.
- सदर प्रत्यारोपण हे रोनाल्ड आणि रिचर्ड ली हेरिक या जुळ्या भावांमध्ये करण्यात आले होते.
- १९९० मध्ये मानवी आजारांवरील उपचारांमध्ये अवयव आणि पेशी प्रत्यारोपणाशी संबंधित संशोधनासाठी जोसेफ ई. मरे आणि अमेरिकन चिकित्सक ई. डॉनल थॉमस यांना शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक संयुक्तपणे प्रदान करण्यात आले होते.