उत्तर प्रदेशमधील राणीपूर ठरला ५३ वा व्याघ्रप्रकल्प...
जगातील वाघांपैकी ८० टक्के वाघ एकट्या भारतात आढळतात. जगभरातील वाघांची संख्या कमी होत असताना भारतातील व्याघ्र प्रक्ल्पांमुळे व्याघ्रसंवर्धन मोहिमेला यश आल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंदर यादव यांनी उत्तर प्रदेशातील राणीपूरची व्याघ्रप्रकल्प म्हणून घोषणा केली आहे.
वैशिष्ट्य:
उत्तर प्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यामध्ये राणीपूर प्रकल्प असून याठिकाणी एकही वाघ आढळत नाही. मात्र, याठिकाणी अनेकदा वाघांच्या पाऊलखुणा पाहण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथे वाघांचे कृत्रिम स्थलांतरण करण्यात येणार आहे.
राणीपूर हे उत्तर प्रदेशातील चौथे व्याघ्रप्रकल्प आहे, जे ५२९.८९ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहे. यात बफर क्षेत्र २९९.०५ तर गाभा क्षेत्र २३०.३२ चौरस किलोमीटर आहे.
व्याघ्र संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ कार्यक्रम:
वाघांची संख्या वाढविण्यासाठी भारत सरकारने १९७३ साली ‘प्रोजेक्ट टायगर’ कार्यक्रमाची सुरुवात केली.
या अंतर्गत
१. वाघांचा अधिवास कमी होण्यासाठी कारणीभूत ठरलेले घटक कमी करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
२. आर्थिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, सौंदर्य आणि पर्यावरणीय मूल्यांसाठी वाघांची व्यवहार्य संख्या सुनिश्चित करणे.
हा यामागील उद्देश होता.
यासाठी भारत सरकारने १९७३ साली उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाची घोषणा केली.
सुरुवातीच्या काळात भारतात १४ हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक जागेवर नऊ व्याघ्रप्रकल्प होते. सध्या, भारतात ५३ व्याघ्रप्रकल्प आहेत.
'राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण' ही प्रशासकीय संस्था यासाठी काम करते.
वाघांची संख्या कमी का होत आहे?
शिकार, वाघांच्या अधिवासात येणारे प्रकल्प, मानव-वन्यजीव संघर्ष यामुळे वाघांच्या संख्येवर परिणाम झालेला दिसून येतो.
जगभरातील वाघांच्या प्रजातींपैकी सुमारे ४० टक्के प्रजाती भारतात आढळतात, दुर्दैवाने यातील नऊ प्रजाती आज धोक्यात आहेत.
मागील १५० वर्षात जगभरातील वाघांच्या संख्येत ९५ टक्क्यांपेक्षा जास्त घट झालेली आढळून येते.
जुलै २०२२ मध्ये 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर' ने कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाममधून वाघ नामशेष झाल्याचे घोषित केले.
भारतातील व्याघ्र प्रकल्प:
सध्या देशात ५३ व्याघ्रप्रकल्प असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ७४ हजार चौरस किलोमीटर इतके आहे.
सर्वात मोठा व्याघ्रप्रकल्प हा आंधप्रदेशातील नागार्जुनसागर-श्रीशैलम असून तो ३२९६.३१ चौरस किलोमीटरवर पसरला आहे तर सर्वात लहान महाराष्ट्रातील बोर व्याघ्रप्रकल्प असून तो १३८ चौरस किलोमीटरवर पसरला आहे.
सर्वाधिक ६ व्याघ्रप्रकल्प हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आहेत.
१. नागार्जूनसागर-श्रीशैलम (३२९६.३१ चौरस किलोमीटर)
२. मानस राष्ट्रीय उद्यान (३१५०.९२ चौरस किलोमीटर)
३. मेळघाट व्याघ्र प्रकल्प (२७६८.५२ चौरस किलोमीटर)
४. सिमिलीपाल राष्ट्रीय उद्यान (२७५० चौरस किलोमीटर)
५. अम्राबाद व्याघ्रप्रकल्प (२६११.३९ चौरस किलोमीटर)
६. सुंदरबन व्याघ्रप्रकल्प (२५८४.८९ चौरस किलोमीटर)
७. दुधवा व्याघ्रप्रकल्प (२२०१.७७४८ चौरस किलोमीटर)
८. सातपुडा व्याघ्रप्रकल्प (२१३३.३० चौरस किलोमीटर)
९. नामडफा व्याघ्रप्रकल्प (२०५२.८२ चौरस किलोमीटर)
१०. कान्हा व्याघ्रप्रकल्प (२०५१.७९ चौरस किलोमीटर)
जगात सुमारे ४ हजार ५०० वाघ आहेत, तर २०१८-१९ च्या व्याघ्रगणनेनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ आहेत.
मध्य प्रदेशात सर्वाधिक ५२६ वाघ आहेत म्हणून ते वाघांचे राज्य म्हणून ओळखले जाते. त्यानंतर कर्नाटक (५२४), उत्तराखंड (४४२), महाराष्ट्र (३१२) आणि तामीळनाडू (२६४) आहेत.