डीआरडीओ(DRDO) कडून इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
काय आहे इंटरसेप्टर क्षेपणास्त्र?
हे एक लांब पल्ल्याचे ‘एडी-१’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे जे हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांना हवेत नष्ट करू शकते तसेच पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेल्या क्षेपणास्त्रांना लक्ष करण्याची याची क्षमता आहे.
ओडिशा जवळील डॉ. अब्दुल कलाम बेटावरून ‘फेज-२ बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स (बीएमडी) इंटरसेप्टर’ (एडी-१) क्षेपणास्त्राची पहिली प्रत्यक्ष चाचणी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था(DRDO) कडून बुधवारी घेण्यात आली.
एडी-१ हे एक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे जे द्विस्तरीय ‘सॉलिड मोटर’ आणि देशांतर्गत विकसित झालेल्या नियंत्रण, वहन आणि मार्गदर्शन प्रणालींनी युक्त आहे. ‘लो एक्झो-अॅटमॉस्फिअरिक’ (वातावरणाच्या सर्वात बाहेरच्या भागात) आणि ‘एण्डो-अॅटमॉस्फिअरिक’ (पृथ्वीपासून १०० किलोमीटर अंतरावर) असलेले लक्ष्य टिपण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. क्षेपणास्त्र किंवा विमान यांना लक्ष करू शकते.
पार्श्वभुमी:
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थने २००० सालाच्या दरम्यान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. २०१० च्या अखेरीस याचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पृथ्वी क्षेपणास्त्राच्या धर्तीवर अद्ययावत हवाई सुरक्षा यंत्रणा तयार करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेप्रमाणे अधिक उंचीवरील लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेली क्षेपणास्त्रे विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यापेक्षाही अधिक उंचीवर लक्ष करण्याची क्षमता असलेले एडी-२ हे क्षेपणास्त्रही विकसित होत आहेत.